नाशिक - २२ नोव्हेंबरला होत असलेल्या नाशिक महापौरपदाची निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. एक उमेदवार निश्चित करण्याऐवजी भाजप आणि शिवसेनेनेही चार-चार नामांकन अर्ज दाखल केले. सेनेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप नगरसेवक उपस्थित असल्याने महापौर निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाला आहे.
भाजपचे संख्याबळ मॅजिक फिगरपेक्षा जास्त असूनही भाजपच्या गोटात भीतीचे वातावरण आहे. घोडेबाजार होऊ नये यासाठी भाजप नगरसेवकांना सहलीला पाठवण्यात आले. बुधवार महापौरपदाचा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यातही कोणी नाराज होऊ नये यासाठी भाजपने महापौर पदासाठी चार आणि उपमहापौर पदासाठी चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सहा नगरसेवक संपर्कात नसून त्यांच्या ऐवजी मनसे मदत करणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये नवे समीकरण जुळवून भाजपचाच महापौर होईल, असा दावा भाजपने केला आहे.
हेही वाचा - देवळालीत बिबट्याच्या भीतीने नागरिकांचा रात्रभर खडा पहारा
शिवसेनेचे नगरसेवक आणि नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सेनेचाच महापौर होणार असून मॅजिक फिगर पेक्षाही जास्त नगरसेवक सोबत असल्याचा दावा सेनेकडून करण्यात आला. सेनेचा अर्ज दाखल करताना भाजपचे नाराज नगरसेवक कमलेश बोडके उपस्थित होते. त्यामुळे बाळासाहेब सानप यांचा फॅक्टर सुरू झाला, अशी चर्चा सुरू झाली. भाजपचे पंधरापेक्षा जास्त नगरसेवक शिवसेनेसोबत असल्याचा खुलासा सेनेने केला.
राष्ट्रवादी आणि मनसेने याबाबत तटस्थ भूमिका घेतली आहे. काँग्रेसने मात्र, सातच नगरसेवक असतानाही सत्तेत वाटा मिळावा म्हणून महापौर उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करत असल्याची भूमिका मांडली. त्यामुळे नाशिकमध्ये महाशिवआघाडी आहे की नाही याचाही सस्पेन्स कायम आहे.