नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटे पेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य विभागाची चांगलीच दमछाक झाली होती. कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने या काळात रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळणे कठीण झाले होते. अशात अनेकांनी प्राणही सोडले. त्यावेळी नाशिकमधील रुग्णालयांना दिवसाला 100 मेट्रिक टन ऑक्सिनची गरज असताना त्याची पूर्तताही खासगी प्रकल्पांमधूनही होत नव्हती. यावर उपाय म्हणून महापालिकेने तिसऱ्या व चौथ्या लाटेची शक्यता गृहित धरून शहरात कोव्हिड उपचार केंद्रांची संख्या वाढवण्याबरोबरच प्रत्येक कोव्हिड उपचार केंद्रावर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची उभारणी केली.
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प : ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची क्षमता दिवसाला 244 मेट्रिक टनपर्यंत वाढवली होती. मात्र तिसरी आणि चौथी लाट आलीच नसल्याने हे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प धूळखात पडून आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयात देखील लाखो रुपये खर्च करून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले. मात्र सध्या तेवढ्या ऑक्सिजनची गरज नसल्याने हेही ऑक्सिजन प्रकल्प पडून आहेत.
23 ऑक्सीजन प्रकल्प उभारले : नाशिक महापालिकेने खासगी ऑक्सिजन पुरवठादारांवर अवलंबून न राहता कोविड सेंटर्सच्या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून घेणारे स्वतःचे 23 ऑक्सिजन प्रकल्प उभारले होते. यात प्रामुख्याने ठक्कर डोम येथील 325 खाटांच्या कोव्हिड उपचार केंद्रासाठी 600 लिटर प्रतिमिनिट क्षमतेचे तीन, छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम येथील 300 खाटांच्या कोव्हिड उपचार केंद्रासाठी 500 लिटर प्रतिमिनिट क्षमतेचे दोन, स्व. मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे 500 लिटर प्रतिमिनिट क्षमतेचे दोन, तसेच अंबड येथील 500 खाटांच्या कोव्हिड उपचार केंद्रासाठी 500 लिटर प्रतिमिनिट क्षमतेचे तीन ऑक्सिजन प्रकल्प उभारले.
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प भंगारात जाणारा : नाशिक शहरात तिसऱ्या व चौथ्या लाटेचा काहीही प्रभाव आढळून आला नाही. यामुळे प्रकल्प उभारताना ती गरज वाटत असली तरी आता महापालिकेसाठी तो कोट्यवधीचा खर्च वाया जाणार आहे. आता कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आली असून यामुळे महापालिकेने सर्व कोव्हिड उपचार केंद्र गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व कोव्हिड उपचार केंद्रांना टाळे लावले असून आता हे सर्व प्रकल्प भांडारगृहात जमा करण्यात येणार आहेत. हे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आता वापरात राहणार नसल्याने पुढच्या काही दिवसामंध्ये त्यांना भंगारात काढावे लागणार आहे.