नाशिक - नाशिकमध्ये ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची अफवा पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, शहर व जिल्ह्यात नव्याने एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नसल्याची माहिती निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी दिली आहे.
नाशिकमध्ये ६ रुग्ण कोरोनाबाधित आढळल्याची अफवा पसरली होती. मात्र, आरोग्य विभागाने यास नकार दिला असून, जिल्ह्यात सद्यस्थितीत एकच रुग्ण असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, ९ संशयित रुग्णांचे अहवाल प्रलंबित असून ते आज(शुक्रवार) रात्री मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे नाशिककरांनी ६ पॉझिटिव्ह रुग्ण असल्याच्या बातमीने घाबरण्याचे कोणतही कारण नाही मात्र, काळजी घेणं गरजेच आहे. दरम्यान, या बातमीनंतर नाशिक शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, नाशिक जिल्हा प्राशसनाने याबाबत खुलासा करून ६ पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची बातमी केवळ आणि केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.