दिंडोरी ( नाशिक )- तालुक्यात एकाच दिवशी ९ कोरोना रुग्ण आढळलेत. दिंडोरी तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५२ वर पोहोचली आहे. या रुग्णांचे नाशिक कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. काही जण पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहवासातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे तालुक्यातील धोका वाढत चालला आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
९ रुग्णांमध्ये मोहाडी , पिंपळगाव केतकी , दिंडोरी नगरपंचायत , लखमापूर ,तिसगाव , व गोपेगाव येथील रुग्णांचा समावेश आहे. ९ रुग्ण वाढल्यानंतर सहा गावतील नागरिकांना संतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काम असल्यावरच घराबाहेर पडावे किंवा विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशीरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना केले .
सर्व वयोगटातील नागरिकांनी काळजी घ्यावी, लहान मुले,जेष्ठ नागरिक तसेच विविध व्याधी असलेले नागरिक यांना कोरोना संसर्गाचा अति धोका आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी आणि सरकारने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार,तालुका वैद्यकीय अधिकारी सुजित कोशिरे यांनी केले आहे.
शनिवारी दिवसभरात तब्बल 413 जण पॉझिटिव्ह आले आहेत.जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 5187 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा 270 वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे कोरोना प्रसार रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.