नाशिक - नवनिर्वाचित महापौर सतीश कुलकर्णी यांनी महापौरपदाचा पदभार स्वीकारला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या सतीश कुलकर्णी यांची निवड झाली आहे. भाजपचे महापालिकेतील संख्याबळ जास्त असल्याने तसेच सतीश कुलकर्णी हे शिक्षीत, संयमी, अभ्यासू आणि ज्येष्ठ सदस्य असल्याने विरोधकांनी देखील आपले उमेदवारी अर्ज मागे घेत सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड केली होती.
हेही वाचा - 'महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधानांनी साथ द्यावी'
महापौरपद मिळताच कुलकर्णी यांनी दुसऱ्याच दिवशी महापौर निवासस्थान असलेल्या रामायण बंगल्यावरून आपल्या कामकाजाला सुरुवात केली. महानगरपालिकेतील आरोग्य, स्वच्छता, विद्युत, नगररचना, कर, पाणी पुरवठा, बांधकाम विभागाच्या बैठका घेत शहरातील समस्या सोडवण्याच्या त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. गुरुवारी महापौर सतीश कुलकर्णी यांनी महानगरपालिकेतील महापौर दालनात पदभार स्वीकारला. यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
हेही वाचा - श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाय आज घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट..
माझी महापौर पदाची कारकीर्द नाशिककरांच्या सेवेसाठी मी अर्पण करतो, असे म्हणत शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा कशा चांगल्या मिळतील यासाठी मी कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी उपमहापौर भिकुबाई बागुल यांनी देखील उपमहापौर दालनाचा पदभार स्वीकारला.