मनमाड (नाशिक) - शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून दोन दिवसात 40 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
मनमाड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती, महावितरण कंपनी, उपजिल्हा रुग्णालय, मनमाड नगरपालिका यापाठोपाठ आता शहर पोलीस ठाण्यातदेखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
शनिवारी सकाळी पोलीस स्थानकातील एक सहायक पोलीस निरीक्षक व तीन कर्मऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. आज पुन्हा 25 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मनमाड शहरात कोरोनाचे एकूण 266 रुग्ण झाले असून सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून सामूहिक संसर्ग वाढत आहे. तर 204 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
मनमाड शहरातील लोकसंख्या बघता हे आकडे कमी असले तरी भविष्यात येथून कोरोनाचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनमाडला जवळपास एक लाख चाळीस हजाराच्यावर लोकसंख्या आहे. येथून सामूहिक संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.