नाशिक - कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने होम क्वारंटाईन असलेल्या पिता-पुत्राला रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले तरी घरात का राहताय, असे विचारत शेजाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आला आहे. नाशिकच्या सिडको परिसरात असलेल्या महाले फार्म या ठिकाणी ही घटना घडली असून, याप्रकरणी अंबड पोलिसानी 6 संशयितांना ताब्यात घेतले आहे.
एकीकडे कोरोना रुग्णांना प्रोत्साहन आणि या आजाराशी दोन हात करण्याची ताकद मिळावी, म्हणून प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. कोणी कोरोनावर मात करून घरी परतल्यावर त्यांच्या शेजारचे नागरिक परिसरातील लोक त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून टाळ्या वाजवून त्यांचे प्रोत्साहन वाढवत असल्याचं चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे. मात्र, यातच शुक्रवारी सकाळच्या सुमारास माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट नाशिकच्या सिडको परिसरात असलेल्या महाले फार्म या ठिकाणी उघडकीस आली आहे गुरुवारी रात्रीच्या सुमारास मुलाचे अहवाल पॉझिटिव्ह आले असताना देखील घरात का राहत आहात, अशी विचारणा करत शेजाऱ्यांनी बाधित आणि त्याच्या वडिलांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. या शाब्दिक बाचबाचीचे पर्यवसान मारहाणीत होऊन शेजाऱ्यांनी कोरोनाबाधित पुत्र आणि त्याच्या वडिलांना बेदम मारहाण केली आहे.
दरम्यान याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कारवाई करत सहा जणांना अटक केली आहे. दरम्यान कोरोना बाधितांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होताना दिसून येत आहे. मात्र, सिडको परिसरात घडलेला प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा असून या घटनेमुळे सिडको परिसरात खळबळ उडाली आहे.