नाशिक- कोरोनातून मुक्त झालेल्या अनेक मधुमेह असलेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होत आहे. त्यामुळे 'अॅम्फोटेरेसीन बी' इजेक्शनच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. नाशिकमध्ये सध्या म्युकरमायकोसिसवर उपचार करण्यासाठी 1200 इंजेक्शनची गरज आहे. मात्र प्रत्यक्षात 94 इंजेक्शनच मिळाल्याने महापालिका प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना दुसरीकडे मात्र म्युकरमायकोसिसचा विळखा अधिक घट्ट होत असून, सद्यास्थितीत शहरात म्युकरमायकोसिसचे 301 रुग्ण उपचार घेत आहेत, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी 1200 'अॅम्फोटेरेसीन बी' इंजेक्शनची आवश्यकता आहे. मात्र महापालिकेला केवळ 94 इंजेक्शन प्राप्त झाल्याने या रुग्णांचा इलाज कसा करायचा असा प्रश्न महापालिकेला पडला आहे.
प्रत्येक रुग्णाला दिवसातून चार इंजेक्शनची गरज
नाशिकमध्ये सध्या 301 रुग्णांना 'अॅम्फोटेरेसीन बी'ची गरज आहे, प्रत्येक रुग्णाला दिवसातून 4 इंजेक्शन द्यावे लागतात. म्हणजेच एकूण 1200 इंजेक्शनची आवश्यकता आहे. 1200 इंजेक्शनची आवश्यकता असूनही केवळ 94 इंजेक्शनच मिळाले आहेत. त्यामुळे कुठल्या रुग्णाला प्राधान्य द्यावे असा पेच निर्माण झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
स्थानिक नेत्यांचा दबाव?
म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी 'अॅम्फोटेरेसीन बी' इंजेक्शनची आवश्यकता आहे. मात्र या इंजेक्शनचा तुटवडा असल्याने, ही इंजेक्शन केवळ महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनामार्फतच मिळतात. यासाठी महापालिकेकडे नोंदणी करावी लागते. मात्र 'अॅम्फोटेरेसीन बी' इजेक्शन मिळावेत यासाठी स्थानिक नेते महापालिका प्रशासनावर दबाव टाकत असल्याची चर्चा आहे.
होही वाचा - नवीन सॉफ्टवेअरमुळे कोरोना चाचणी रिपोर्ट तासाभरात मोबाईलवर