नाशिक - नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्तीच्या आदेशाला आज मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त झाले आहे.
वरिष्ठ न्यायालयात अपिलासाठी दिवसाचा कालावधी
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ बरखास्तीच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने आज मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती बिस्ट व धानुका यांच्या खंडपीठाने आज हा निकाल दिला आहे. बँकेतील अनियमितता व नियमबाह्य कामकाजामुळे नाबार्डने विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळली असून, त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या आदेशाला मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात वरिष्ठ न्यायालयात अपिलासाठी केदा आहेर यांना पंधरा दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे. या याचिकेवर दोन महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. विद्यमान अध्यक्षांनी येत्या आठ दिवसांत प्रशासकांना कार्यभार देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा बँकेवर अध्यक्ष म्हणून भाजपचे केदा आहेर आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली असून यामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त झाले आहे. आता विद्यमान संचालकांना आगामी निवडणुका लढविण्याचा मार्ग देखील बंद झाला आहे.
सहकारातील तरतुदीनुसार आगामी निवडणुकांसाठी अपात्र ठरवले जाण्याची शक्यता..?
आमदार शिरीष कोतवाल, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार सुहास कांदे, आमदार सीमा हिरे, आमदार दिलीप बनकर, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार अनिल कदम, जे. पी. गावित यांच्यासह अनेक राजकीय पक्षांचे नेते आणि लोकप्रतिनिधी या बँकेचे संचालक आहेत. त्यांना सहकारातील तरतुदीनुसार आगामी निवडणुकांसाठी अपात्र ठरवले जाण्याची शक्यता देखील आता न्यायालयाच्या निर्णयामुळे निर्माण झाली आहे. या नेत्यांना आता बँकांची दारे बंद झाल्यान अनेक राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी आपले कुटुंबीय अथवा समर्थकांना या निवडणुकांमध्ये संधी देण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, यामुळे यातील किती नेते आपले समर्थक आणि कार्यकर्त्यांना संधी देण्याचा मोठेपणा या निवडणुकांदरम्यान दाखवतील, याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.