नाशिक - मनमाड येथे रेल्वे कर्मचाऱ्यासाठी सेवेत असलेल्या रेल्वे रुग्णालयामध्ये सध्या सुविधांचा अभाव आहे. रक्तदाबासारख्या किरकोळ आजारांसाठीही येथे औषधे उपलब्ध नाहीत. रेल्वे रुग्णालयात तत्काळ अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी नॅशनल रेल्वे मजदुर युनियनच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
मनमाड हे रेल्वे जंक्शन आहे. या ठिकाणी असलेल्या केंद्रीय अभियांत्रिकी कारखान्यात आणि ओपन लाईन शाखेत जवळपास दीड हजार पेक्षा जास्त कामगार काम करतात. ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी, सेवेत असलेले कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी असलेले रेल्वे रुग्णालयच सध्या व्हेंटिलेटरवर आहे. रुग्णालयात असलेला स्टाफ कमी करून अवघ्या एक ते दोन डॉक्टरांवर सर्व जबाबदारी देण्यात आली आहे. दोन-तीन डॉक्टर मिळून दीड हजार कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहेत.
हेही वाचा - खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता पाच दिवसांचा आठवडा
या रुग्णालयामध्ये रक्त लघवी तपासणी असलेली लॅब बंद आहे. एक्सरे मशीन आणि टेक्निशियन उपलब्ध नाही. या रुग्णालयाने एका खासगी रुग्णालयासोबत टायअप केले असून तेथे देखील कर्मचाऱ्यांना जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. या सर्व गोष्टींची रेल्वे प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, रुग्णालयात सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, या मागण्यांसाठी नॅशनल रेल्वे मजदुर युनियनने रुग्णालयाच्या समोर धरणे आंदोलन केले.
या वेळी कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यूनियनने दिला. या आंदोलनात नॅशनल रेल्वे मजदुर युनियनचे सर्व रेल्वे कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते.