येवला (नाशिक) - शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाने अधिक दक्षता घेऊन रुग्णांच्या संख्येत वाढ होणार नाही, यासाठी खबरदारी घ्यावी, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पोलीस व संबंधित अधिकार्यांना दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी अधिकार्यांची बैठक घेतली. यावेळी तालुका प्रशासनाला येणार्या अडचणींबाबत जिल्हाधिकार्यांशी संपर्क करत आवश्यक त्या वैद्यकीय सुविधेबाबत तसेच कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आवश्यकता असेल तर नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात यावे, असे आदेश दिले. ते म्हणाले की, किराणा माल, औषधे, भाजीपाला आणि कृषीमालाची दुकाने सुरू ठेवायची आहेत. मात्र, गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
जीवनावश्यक मालाची वाहतूक सुरळीत ठेवण्याचे नियोजन करावे. योग्य नियोजन करून बाजार सुरू ठेवावे, अशा सूचना करत पोलिसांनी सदर परिस्थिती संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळावी. मात्र, अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त फिरणार्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक औषध साठा, मास्क, किट उपलब्ध आहे की, नाही याबाबत आढावा घेतला. तसेच यंत्रणेच्या गरजा समजून घेत त्या तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
रमजानच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवाना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच फिजिकल डिस्टन्सचे पालन करण्यात यावे, असे आदेश देत पोलीस तसेच कर्मचार्यांनी कर्तव्यावर देखील सोशल डिस्टन्सचे पालन करून कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकार्यांना केल्या. यावेळी येवल्याच्या प्रांताधिकारी ज्योती कावरे, निफाडच्या प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, निफाडचे तहसीलदार दीपक पाटील, येवल्याचे तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, येवल्याचे गटविकास अधिकारी उमेश देशमुख, निफाडचे गटविकास अधिकारी डॉ.संदीप कराड, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, अनिल भवारी, लासलगाव पोलीस ठाण्याते सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.