नाशिक - सालाबादप्रमाणे यावर्षीही महिलांचा आवडता सण म्हणजेच वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असल्याने वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्यासाठी जाणे अनेक महिलांनी टाळले. कोरोनाचा संसर्ग होऊ नये आणि शासनाच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी अनेक महिलांनी घरीच पूजा करत हा सण साजरा केला.
कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. त्यामुळे, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहे. याचा फटका सणांनादेखील बसला आहे. आज ठिकठिकाणी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी महिलांनी मास्कचा वापर करत सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला. तर, अनेकांनी घरीच सण साजरा केला.
यावर प्रतिक्रिया देताना धनश्री रानडे या गृहिणी म्हणाल्या, वटपौर्णिमा हा आम्हा बायकांचा आवडता सण आहे. माहेर असो की सासर आम्ही सर्व मैत्रीटणी छान तयारी करून वडाच्या झाडाची पूजा करायला जातो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मैत्रिणींनी आपल्या घरीच पूजा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, यंदा कोरोनाने हिरमोड केला असल्याचे त्यांनी सांगितले.