नाशिक - महाराष्ट्र दिनापासून जिल्ह्यातील पाच लसीकरण केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाल सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांत एकूण 598 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून, हे लसीकरण पुढील सात दिवस सुरू राहाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
दरम्यान जिल्ह्यात नाशिक महापालिका क्षेत्रात दोन, ग्रामीण क्षेत्रात दोन तर मालेगाव महापालिका क्षेत्रात एक केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक लसीकरण केंद्राला दोन हजार या प्रमाणे एकूण 5 केंद्रांवर 10 हजार लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ही लसीकरण मोहीम पुढील 7 दिवस चालणार आहे.
जिल्ह्यात 5 केंद्रांवर लसीकरण
महापालिका कार्यक्षेत्रात इंदिरा गांधी रुग्णालय, पंचवटी कारंजा व नाशिक रोड नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नाशिक ग्रामीण क्षेत्रात मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्र (दिंडोरी) व पिंपळगाव बसवंत प्राथमिक आरोग्य केंद्र निफाड तर मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातील शहरी आरोग्य केंद्र निमा या केंद्रावर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी २७६ नागरिकांनी लसीकरण केले असून, त्यात नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात इंदिरा गांधी रुग्णालयात 90, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र नाशिक रोड येथे 95 तर नाशिक ग्रामीण भागात मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्र(दिंडोरी) येथे 28 पिंपळगाव बसवंत प्राथमिक आरोग्य केंद्र (निफाड) येथे 49 इतके तर मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातील शहरी आरोग्य केंद्र निमा येथे 14 जणांनी लसीकरण केले. दुसऱ्या दिवशी 322 नागरिकांनी लसीकरण केले. यामध्ये इंदिरा गांधी रुग्णालयात 87, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र नाशिक रोड 71 तर नाशिक ग्रामीण भागात मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्र(दिंडोरी) येथे 84, पिंपळगाव बसवंत प्राथमिक आरोग्य केंद्र (निफाड) येथे 80 जणांनी लसीकरण केले आहे.
हेही वाचा - 'भाजपकडे बंगालचे नेतृत्त्व करणारा चेहरा नसल्यानेच जनमत ममताच्या बाजूने'