नाशिक - देवळाली शिवारात जवळपास 100 कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा झाला असल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला आहे. मात्र, आता या घोटाळ्याच्या चौकशीत दिरंगाई होत असल्यामुळे पुन्हा एका नविन वादाला तोड फुटले आहे. तर नि:पक्षपातीपणे चौकशी करुन त्यात मनपा अधिकारी दोषी असल्यास त्यांना पाठीशी न घालता कारवाई होणार, असा मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी म्हटले आहे.
100 कोटी रुपयांचा घोटाळा?
देवळाली शिवारात वादग्रस्त 100 कोटींचा टीडीआर घोटाळा झाला असल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला आहे. या प्रकरणाला रोजच नवनवीन वळण मिळत असल्याने आता महापालिकेकडूनच या चौकशीला बगल देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रशासन उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने या घोटाळ्याच्या चौकशी प्रकरणी अंतिम अहवाल सादर केला असल्याने मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी नव्याने नियुक्त केलेल्या अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. मात्र, समितीचा अंतिम अहवाल सादर झाला असल्यामुळे आम्ही वेगळा अहवाल कसा देऊ? असा पवित्रा या चौकशी समितीने घेतला आहे. यामुळे या वादाला आता नवीन तोंड फुटले आहे. तर या घोटाळ्याची नि:पक्षपातीपणे चौकशी करून यात मनपा अधिकारीही दोषी आढळून आल्यास त्यांना पाठीशी न घालता कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिला आहे.
हेही वाचा - जामनगरमध्ये १९८६च्या काळातील चोरी उघड; तब्बल १ कोटी दहा लाख किंमतीचे सोने लंपास
मंत्री एकनाथ शिंदेंनी दिले होते चौकशीचे आदेश -
अॅडव्होकेट शिवाजी सहाणे, नगरसेवक सलीम शेख यांनी या टीडीआर घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यानंतर नगरविकास विभागाकडे तक्रार करून त्यांच्यामार्फत या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. महापालिकेने प्रशासन उपायुक्तांच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली. तर शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पुन्हा याबाबत तक्रार केल्यानंतर नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा आयुक्तांना या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर आयुक्त कैलास जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. मात्र, तरी या प्रकरणाची चौकशी होत नसल्याचे दिसत आहे.
महापालिकेकडूनच या प्रकरणातील व्यावसायिकाला क्लिनचीट देण्यासाठी दिरंगाई होत असल्याची चर्चा आता पालिका वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी या प्रकरणी दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे. या प्रकरणाला काहीसा पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केल्याने टीडीआर घोटाळा आता पुढे काय वळण घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.