नाशिक Salim Kutta : मुंबई 1993 बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याचा आणि नाशिकचे उद्धव ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचा पार्टी व डान्स प्रकरणातील काही फोटो आणि व्हि़डिओ समोर आले आहेत. या प्रकरणी नाशिक पोलीस पुण्याच्या येरवडा कारागृहात जाऊन सलीम कुत्ताचा जबाब घेण्यास जाण्याची दाट शक्यता आहे. चौकशीमध्ये बडगुजर यांच्याकडून पोलिसांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने पोलिसांची ही पुढची भूमिका राहणार असल्याचं म्हटलं जात आहे.
काय आहे प्रकरण? : 1993 सालच्या मुंबई बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी मोहम्मद सलीम मीर शेख उर्फ सलीम कुत्ता हा जिवंत आहे. तो पुण्याच्या येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सुमारे सात वर्षांपूर्वी नाशिक शहराजवळच्या एका खेड्यालगतच्या फार्म हाऊसमध्ये झालेल्या रंगारंग पार्टीत 1993 च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता हा नाचत होता. त्याच्यासोबत उद्धव ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे देखील नृत्य करताना दिसत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. याबाबतचे आरोपही भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले होते.
बडगुजर यांची पोलीस चौकशी सुरू : याबाबत बडगुजर यांची पोलीस चौकशी सुरू आहे. सलग चौथ्या दिवशी त्यांची कसून चौकशी करण्यात आली. शहरात पार्टी नेमकी कशानिमित्त व कोणी आयोजित केली? हे अद्याप पोलिसांसमोर आलेलं नाही. बडगुजर काही प्रश्नांची उत्तरे देतात, तर काही उत्तरांसाठी पोलिसांकडे वेळ मागतात. यामुळे साशंकता निर्माण झाली आहे. काही उत्तरे देतानाही त्यांनी सावधगिरी बाळगली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षित असे समाधानकारक सहकार्य चौकशीत मिळत नसल्याची पोलीस वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळं नाशिक पोलीस येरवडा कारागृह प्रशासनाकडे लवकरच पत्रव्यवहार करून या प्रकरणात गुन्हेगार सलीम कुत्ता याचा जबाब घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतची अधिकृत माहिती पोलिसांकडून मिळालेली नाही. या सर्व शक्यता आहेत.
गुन्हे शाखेकडे चौकशी : पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेकडे सुरू असलेल्या चौकशीसाठी सोमवारी बडगुजर प्रकृती अस्वस्थाचे कारण सांगत अनुपस्थितीत राहिले होते. मंगळवारी त्यांना पुन्हा हजर राहण्यास सांगितले आहे. तीन साक्षीदारांची कसून चौकशी करण्यात आली आहे. पार्टीचा संपूर्ण व्हिडिओ गुन्हे शाखेने तपासून इतरांची ओळख पटवून त्यांना चौकशीसाठी बोलवले आहे.
अडकवण्याचा प्रयत्न : सलीम कुत्ता व्हिडिओ प्रकरण असो की, एसीबीची चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्याचा प्रकार हा केवळ राजकीय हेतूने प्रेरित आहे. यात काही तथ्य नाही. एमडी प्रकरणात सत्ताधाऱ्यांविरोधात काढलेले मोर्चे यामुळे अडकवले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.
(बातमीसाठी वापरलेला फोटो हा भाजपा आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवलेला आहे. या फोटोची खात्री ईटीव्ही भारत करत नाही)
हेही वाचा
- बडगुजरांवरील आरोपानंतर भाजपाचे मोठे नेते सलीम कुत्तासोबत? सुषमा अंधारेंनी दाखवला फोटो
- ठाकरे गटाच्या नेत्याची मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टी, नितेश राणेंनी विधानसभेत दाखवले फोटो; सुधाकर बडगुजर यांनी दिलं 'हे' स्पष्टीकरण
- सलीम कुत्ता प्रकरणानंतर 33 लाखाच्या फसवणूक प्रकरणी सुधाकर बडगुजरांवर गुन्हा दाखल