नाशिक - शहरात गेल्या काही दिवसांपासून मोटरसायकल चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याविरोधात नाशिक पोलिसांनी गुन्हेगारांच्या विरोधात शोधमोहीम सुरू केली आहे. गुन्हे शाखा पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या नेतृत्वाखाली दुचाकी चोरणारी टोळीस गजाआड केले आहे.
समाधान उर्फ गोकुळ बळीराम गव्हाणे (वय २५), प्रशांत भगवान जाधव (वय २०) दोघे (रा. पळसे जि. ता. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून मुद्देमालासह 10 मोटारसायकल ताब्यात घेण्यात आले. जिल्हा रुग्णालयातून ४, एसएनबीटी कॉलेज समोरून ३, बिटको रुग्णालय पार्किंगमधून १ देवळाली कॅम्प १ बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडा येथून १ अशा १० दुचाकी चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यांच्याकडून ३ लाख ९० हजार रुपयांच्या १० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील तपास गुन्हे शाखा पथक करीत आहे. अजूनही मोठे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.