नाशिक - जुने नाशिक भागात 3 दिवसांपूर्वी नागझरी शाळेसमोर वैमानस्यातून 2 गटांमध्ये हाणामारीची घटना घडली होती. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. या घटनेनंतर ताब्यात घेण्यात आलेल्या 6 संशयित आरोपींची शिवाजी चौक, नानावली,अमर धाम रोड आदी परिसरातून वरात काढण्यात आली. तसेच भर रस्त्यात त्यांच्याकडून उठाबशा काढून घेतल्या.
यावेळी सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, सहायक निरीक्षक दत्ता पावर आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांनी संशयितांना पकडून दाखवलेल्या तत्परतेबद्दल नागरिकांना समाधान व्यक्त केले आहे.
मद्य विक्रीची दुकाने उघडल्यानंतर गुन्हेगारीमध्ये वाढ?
नाशिकमध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात तब्बल दीड महिने मद्य विक्रीची दुकाने बंद असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, मागील 20 दिवसांपासून मद्य विक्रीची दुकाने पुन्हा सुरू झाल्यानंतर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामध्ये हाणामारी, कौटुंबीक वाद यासारख्या घटना वाढल्या आहेत. यामुळे एकीकडे लॉकडाऊनचा बंदोबस्त करण्यात व्यस्त असलेल्या पोलिसांची गुन्हेगारीच्या घटनांमुळे डोकेदुखी वाढली आहे.