नाशिक : रिझर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर पेट्रोल पंप चालकांना वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. ग्राहक 50 - 100 रुपयाचे इंधन भरण्यासाठी थेट 2000 रुपयांची नोट देत असल्याने पंपचालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता किमान 2000 रुपयांचे पेट्रोल किंवा डिझेल घेतले तरच 2000 रुपयांची नोट स्वीकारण्यात येईल, अशी भूमिका नाशिक जिल्हा पेट्रोल व डीलर्स वेलफेयर असोसिएशन घेतली आहे.
पेट्रोल पंपावर 2000 च्या नोटा देण्याचे प्रमाण वाढले : दोन दिवसांपूर्वी 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व बँकेने घेतला. या नोटा बदलण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून 2000 रुपयांची नोट चलनात अल्प प्रमाणात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांकडे या नोटा अगदी कमी प्रमाणात आहेत. मात्र छोटे विक्रेते, व्यापारी आणि अन्य व्यवसायिकांकडे या नोटा असल्याने त्या बदलण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
पंपचालकांकडे सुट्टे पैशांची टंचाई : सरकारी बँकांशिवाय पेट्रोल पंपावर देखील या नोटा बदलल्या जात आहेत. दोन हजाराची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक वाहन चालक 50-100 रुपयांचे पेट्रोल भरण्यासाठी पंपावर येतात आणि 2000 रुपयांची नोट देतात. पंपचालकांकडे या नोटा वाढत असल्याने आता त्यांना सुट्टे पैशांची टंचाई होत आहे. यापूर्वी एक लाख रुपयांच्या एकूण जमा रक्कमेत एक दोन नोटा दोन हजार रुपयांच्या असायच्या, मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नाशिक मधील पेट्रोल पंप चालकांनी हा निर्णय घेतला असल्याचे नाशिक जिल्हा पेट्रोल डिझेल वेलफेयर असोसिएशनचे अध्यक्ष भूषण भोसले यांनी सांगितले.
हेही वाचा :