नाशिक : कर्णबधिर मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पडसाद कर्णबधिर विद्यालय गेल्या 33 वर्षांपासून शिक्षणाचे धडे देत आहे. आज या शाळेत शंभरहून अधिक कर्णबधिर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रक्षाबंधन सणानिमित्त या शाळेतील कर्णबधिर विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा संदेश देत, पर्यावरणपूरक सीड्स राख्या बनवल्या आहेत. या राख्या बनवण्यासाठी भाज्यांमध्ये पालक, शेपू, मेथी, कारले, धने तसेच कडधान्यांमध्ये मका, तूर, हरभरा, कुळीथ, पांढरी नागली तर फळांमध्ये सिताफळ, जांभूळ या बियांचा वापर करण्यात आलाय.
उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद : आज आम्ही एक वेगळा उपक्रम केला आहे. रक्षाबंधन झाल्यानंतर राख्या फेकून न देता त्यांचे कुंडीत रोपण करणार आहोत. यासाठी विविध प्रकारच्या बिया आणून त्यावर प्रक्रिया केली आहे. जेणेकरून या बियांचं रोपण केल्यानंतर आठ ते दहा दिवसात त्याचं रोप तयार होणार आहे. आमचं हे विक्री केंद्र नाही. येणाऱ्या ऑर्डरप्रमाणं आम्ही राख्या बनवून देत आहोत. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पडसाद कर्णबधिर विद्यालयाच्या संस्थापिका सुचेता सौंदानकर यांनी सांगितलंय.
'म्हणून' इको फ्रेंडली राख्या : आपण बघतो रक्षाबंधन झालं की, भावाच्या हातावर दोन चार दिवसच राख्या असतात. नंतर त्या इतरत्र टाकून दिल्या जातात, यामुळं आम्ही दिव्यांग विद्यार्थ्यांकडून इको फ्रेंडली राख्या बनवून घेतल्या आहेत. यात आम्ही कडधान्यं, भाज्या यांच्या बियाणांपासून राख्या बनवून घेत आहोत. ही राखी नंतर मातीमध्ये टाकली तर यापासून रोप तयार होणार आहे. पुढे त्याचा फायदा होऊ शकेल. यासाठी आम्ही रोटरी क्लब ऑफ जनस्थानकडून या विद्यार्थ्यांमार्फत एक हजार राख्या बनवून घेत आहोत, अशी माहिती डॉ. शंतनू सौंदानकर यांनी दिलीय.
चांगलं काम करण्याचा आनंद : आम्ही सगळे विद्यार्थी इको फ्रेंडली राख्या बनवत आहोत. पर्यावरण संवर्धनासाठी आमचा प्रयत्न असून आम्ही सीड्स राख्या बनवत आहोत. या राख्या बनवताना आम्ही समाजासाठी काहीतरी चांगलं काम करत असल्याचा आनंद आम्हाला होत आहे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिलीय.
हेही वाचा :