नाशिक : जिल्ह्यात अपघात व इतर कारणांनी मृत्यू झालेल्या अनोळखी मृतदेहांच्या अंतिम प्रवासात देखील दुःख वेदना टळत नाही. हेच वास्तव नाशिक शहरात मागील वर्षी दिसून आले. तब्बल 291 अनोळखी मृतदेहांच्या नातेवाईकांची वाट बघून सुद्धा मृतदेह घेण्यास कोणीच न आल्याने कायदेशीर पूर्ततेनंतर या मृतदेहांवर महानगरपालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
वर्षभरात 291 मृतदेहांवर अंत्यसंस्कार : नाशिकमध्ये 2022 वर्षांमध्ये 291 अनोळखी मृतदेह आढळून आले. या मृत व्यक्तींचे कोणीही नातेवाईक समोरून न आल्याने जिल्हा रुग्णालयकडून असे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी महानगरपालिकेकडे सुप्रद करण्यात आले. या सर्व मृतदेहांवर महानगरपालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांकडून अशा प्रकरणात मृतदेहांची पोलीस ठाण्यात नोंद केल्यानंतर हे मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले जातात. या मृतदेहांची ओळख पटली नाही अथवा मृतदेह ताब्यात घेण्यास कोणी समोर आले नाही तर हे मृतदेह जिल्हा रुग्णालयातून महानगरपालिकेला सोपवले जातात.
ओळख पटवण्यासाठी प्रयत्न : डॉ हेमंत घंगाळे याबाबत सांगितले की, शहरात अनोळखी मृतदेह आढळून आल्यानंतर या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी कायद्यानुसार पाच दिवस प्रतीक्षा केली जाते. तसेच या कालावधीत हरवलेल्या व्यक्तींच्या वर्णनांशी तुलना करून ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जातो.
इतक्या दिवसानंतर अंत्यसंस्कार : मृतदेहाची संबंधित पोलीस ठाण्यात नोंद झाल्यानंतर चार ते पाच दिवस ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जातो. या कालावधीत मृतदेहांच्या शवच्छेदनातून मृतदेहाचे कारण व अन्य चौकशीच्या सर्व कायदेशीर पुर्तता करून मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी महानगरपालिकेला सुपूर्द केला जातो, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अंत्यसंस्काराचा खर्च कोण करतो : नाशिक शहरात मृतदेहांवर अंत्यसंस्काराची महानगरपालिकेकडून मोफत सोय करण्यात आली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात आढळणारे बेवारस मृतदेह यांचे अंत्यसंस्कार याच योजनेतून मोफत केले जातात.
वर्षभरातील मृतदेहांची संख्या : जानेवारी 17, फेब्रुवारी 30, मार्च 20, एप्रिल 28, मे 12, जून 33,जुलै 18,ऑगस्ट 26, सप्टेंबर 31,ऑक्टोबर 21,नोव्हेंबर 43 तर डिसेंबर 22 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा : Mother Committed Suicide With Daughter : धक्कादायक! .....तिलाही सोबत घेऊन जात आहे असे म्हणत आईने लेकीसह केली आत्महत्या