मनमाड (नाशिक) - कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या मनमाड शहरात 09 नवे रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. यातील 6 जणांचा मृत्यू झाल्याने शहरातील नागरिक तसेच प्रशासनाची धावपळ उडाली आहे. शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता शतकापार गेली असून यापैकी 59 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 38 जणांवर उपचार सुरू आहेत.
सध्या शहरातील कोरोना सेंटरमध्ये 28 जणांवर उपचार सुरू आहेत. 8 जणांवर होम क्वारंटाईन उपचार सुरू असून नाशिक येथे 2 जणांवर उपचार सुरू आहेत. तर एकूण 59 जणांनी कोरोनावर मात मिळवली आहे. शहरातील पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या घरातील जवळपास 21 जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यांचे अहवाल प्रलंबित असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. प्रशासन एवढी काळजी घेत असताना नागररिक हलगर्जीपणा करत आहेत. अनेक ठिकाणी विनाकारण गर्दी करणे काम नसताना गावात फिरणे मास्क न वापरणे. यामुळे देखील संसर्ग वाढत आहे. आता पावसाळ्याच्या दिवसांत नव्याने रुग्ण वाढण्याची शक्यता देखील डॉक्टरानी बोलून दाखवली आहे.
शहरातील दुकाने सम-विषम पद्धतीने सुरू आहेत. मृत झालेल्या व्यक्तीच्या आजूबाजूला औषध फवारणी करून तेथे कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहे. तेथील नागरिकांना घरपोच जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहेत. ही साखळी तुटावी म्हणून सायंकाळी 5 नंतर संचारबंदी देखील लावण्यात आलेली आहे. तरीही नागरिकांनी जागरूक राहून स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
संकटकाळात मुख्याधिकारी यांची बदली.....
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनमाडचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांचे चांगले काम सुरू होते. त्यात त्यांनी एकदा मनमाड शहराला कोरोनामुक्त देखील केले होते. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता व दुसरा अधिकारी न येताच मेणकर यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेचे काम रखडले असून लवकरात लवकर मुख्याधिकारी नेमावा, अशी मागणी जोर वाढू लागली आहे.
*मनमाड कोरोना अपडेट
*रुग्ण संख्या- 103
* मृत्यू-06
* कोरोना मुक्त-59