नाशिक - राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोनाचा सरासरीपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट आहे, अशा १८ जिल्ह्यातील रुग्णांचे गृहविलगिकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात नाशिक जिल्ह्याचा समावेश असून अद्याप राज्य सरकारकडून स्थानिक प्रशासनाला कुठलेच आदेश प्राप्त झाले नाही. तसेच सरकारने आधी वैद्यकीय सेवा चांगल्या द्याव्यात मग गृहविलगीकरण बंद करावे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
वैद्यकीय सुविधा चांगल्या हव्या -
नाशिक जिल्ह्यात मार्च, एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला होता. या दोन महिन्यात कोरोनाबधित रुग्णांमध्ये तब्बल १ लाख जणांना कोरोनाची लागण झाली होती. या काळात हॉस्पिटलमधील बेड ऑक्सिजन आणि रेमडिसीवीरचा तुटवडा जाणवल्याने रुग्ण हैराण झाले होते. या काळात जेवढे रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते त्यापेक्षा अधिक रुग्ण हे गृहविलगीकरणामध्ये राहून बरे झालेत. मात्र आता १ महिन्याच्या लॉकडाऊननंतर स्थिती सुधारत असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून रुग्ण संख्या कमी झाली आहे. अशात आता सरकारने गृहविलगिकरण बंद करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सरकारने वैद्यकीय सेवा चांगल्या द्याव्यात, मग गृहविलगिकरण बंद करावे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
नाशिक शहरातील हॉस्पिटलमधील बेडची परिस्थिती -
एकूण बेड ८ हजार २१४ रिक्त बेड ५ हजार ७७५
जनरल बेड ३ हजार, रिक्त बेड २ हजार १३४
ऑक्सिजन बेड ३ हजार ७२६ रिक्त बेड २ हजार ४७७
आयसीयू बेड १ हजार ७८ रिक्त बेड ७०१
व्हेंटिलेटर बेड ८३९ रिक्त बेड ४६३
शहरातील कोरोना रुग्णांची परिस्थिती -
-आतापर्यंत २ लाख २१ हजार ७८९ कोरोना पॉझिटिव्ह
-आतापर्यंत २ लाख १४ हजार ६७३ कोरोनामुक्त
-आत्तापर्यंत १ हजार ९२७ रुग्णांचा मृत्यू
-सद्यस्थितीत ५ हजार ८१३ रुग्णांवर उपचार सुरू
-सद्यस्थितीत २ हजार ९६५ रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
-सद्यस्थितीत २ हजार ८४८ रुग्ण होम आयशोलेशन मध्ये
ऑक्सिजनची मागणी घटली -
नाशिक जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा कमी होत असून हॉस्पिटलमध्ये देखील रुग्ण संख्या कमी झाल्याने ऑक्सिजनची मागणी घटली आहे. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यास १०६ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होत असून ८९ मेट्रिक टन रोजची गरज आहे. म्हणजे ऑक्सिजन गरज भागवून १७ मेट्रिक टन ऑक्सिजन शिल्लक राहत आहे.
औषधाचा पुरेसा साठा -
नाशिक जिल्ह्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम बघायला मिळत असून रुग्ण संख्येत घट होत आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागावरील ताण काहीसा कमी झाला आहे. तसेच हॉस्पिटलमधील बेड रिक्त होत असून औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं आरोग्य विभागाने सागितलं आहे.
हेही वाचा - राज्यात 24 हजार 752 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 453 मृत्यू