नाशिक - जिल्ह्याची लोकसंख्या ही ६५ लाख आहे. त्यात जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या ३८० इतकी आहे. त्यातही ३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १६ रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. मात्र, जिल्ह्यातील रुग्णांचे आकडे मोठमोठे दाखवले जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावाही भुजबळांनी केला आहे.
हेही वाचा... 'ती' कोरोनाबाधितांचे वाढवतेय मनोबल, आयसोलेशन वार्डमध्ये देतेय योगाचे धडे
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-१९ आणि निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची आढवा बैठक घेतल्यानंतर भुजबळांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
कोरोना विषाणूची साथ आल्यावर पहिला महिना संपुर्णतः गोंधळात गेला. त्यानंतर शासनाने रुग्णांना सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या. मात्र, आता जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असून कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या ६५ लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यात फक्त ३८० इतकी आहे. लाॅकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर रुग्ण संख्या वाढत असल्याची चिंता मात्र भुजबळांनी यावेळी व्यक्त केली. पुढील काळात दुकाने, कारखाने सर्वकाही सुरळीत होऊन अर्थचक्र पूर्वपदावर येइल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
वादळामुळे शेतीचे मोठे नुकसान...
चक्रीवादाळामुळे जिल्ह्यातील अनेक भागात शेतीचे मोठे नूकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी पोल्ट्री फर्म, पाॅली हाउस आणि नागरिकांच्या राहत्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली असून जिल्हाधिकार्यांना सर्व सूचना दिल्या असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
भाजपला लगावला टोला...
मुख्यमंत्री ठाकरे चांगले काम करत आहेत. न्यूज चॅनेलच्या सर्वेक्षणात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ते पाचव्या स्थानी आहे. मात्र, भाजपचे मुख्यमंत्री कार्यक्षम असताना देखील त्यांना पहिल्या दहामध्ये स्थान मिळाले नाही, असा उपरोधिक टोला भुजबळ यांनी भाजपला लगावला.