नाशिक - जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधित गर्भवती महिलांवर उपचार करण्यासाठी मे महिन्यात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला. याठिकाणी गेल्या चार महिन्यात 47 गर्भवतींची यशस्वी प्रसूती झाली आहे. या सर्व माता आता आपल्या बाळांसोबत कोरोनामुक्त होऊन घरीही गेल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असून आतापर्यंत 68 हजाराहून अधिक जणांना कोरोनाचा लागण झाली आहे. सुमारे 60 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले तर, 1 हजार 176 जणांचा कोरोनाने बळी घेतला. सध्या 7 हजार कोरोनाबाधितांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित गर्भवतींची संख्या बघता जिल्हा प्रशासनाने या महिलांवर योग्य उपचार व्हावे यासाठी मे महिन्यात कोरोनाबाधित गर्भवती माता विशेष कक्ष स्थापन केला. या अंतर्गत आतापर्यंत 900 ते 1000 गर्भवतींची चाचणी करण्यात आली. यात 47 गर्भवती महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यांची विशेष काळजी घेत सुखरूप प्रसूती करण्यात आली. यातील दोन बाळांचेही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्यावर योग्य उपचार केल्यानंतर ते देखील कोरोनामुक्त झाले आहेत.
नवजात बाळाला बाधा होण्याचा धोका -
गर्भवती महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्यावर त्यांच्या प्रसूतीनंतर नवजात बाळाला कोरोना होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जन्म झाल्यानंतर बाळांची तत्काळ चाचणी करून त्यांना एसएनसीयू विभागात उपचारासाठी दाखल केले जाते.
गर्भवती महिलांची विशेष काळाजी -
नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधित गर्भवती महिलांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यात एकूण 20 बेड्स ठेवण्यात आले आहेत. 10 बेड हे कोरोना पॉझिटिव्ह महिलांसाठी असून 10 बेड कोरोना संशयित गर्भवती महिलांसाठी आहेत. नवजात बाळांसाठीही स्वतंत्र रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे दाखल होणाऱ्या प्रत्येक गर्भवती महिलेची कोरोना चाचणी केली जाते. या महिलांना विशेष आहार दिला जातो.