नाशिक - रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तीन तरुणी व एका तरुणाला आडगाव पोलिसांनी अटक केल्यानंतर या गुन्ह्यात आणखी चौघा संशयितांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले. यावरून पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील विरार आणि वाडा येथून तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल २० रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केली आहेत.
हेही वाचा - नाशिक - सिडकोत अज्ञात समाजकंटकानी सात कारच्या काचा फोडल्या
तत्पूर्वी, रविवारी नाशिकमधून आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आता आरोपींची संख्या आठवर गेली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार प्रकरणातील आजवरची ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. पंचवटीतील के.के. वाघ महाविद्यालयासमोर रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दराने विक्रीसाठी दोन तरुणी येणार असल्याचे औषध निरीक्षक सुरेश देशमुख यांना कळाल्यानंतर त्यांनी आडगाव पोलिसांच्या मदतीने सापळा रचला होता. १४ मे रोजी रात्रीच्या सुमारास दोन इंजेक्शन ५४ हजार रुपयांना विक्री करताना दोन्ही तरुणींना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. त्यांची अधिक चौकशी केली असता आणखी एक तरुणी व एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दुचाकी, मोबाईलसह दोन रेमडेसिवीर इंजेक्शनही जप्त करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. यादरम्यान आडगाव पोलिसांनी केलेल्या चौकशीत आणखी चार संशयितांची नावे पुढे आली होती.
पोलिसांनी रविवारी (दि.१६) नाशिकमधून एका आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर सोमवारी (दि.१७) आणखी तिघांच्या टोळीस विरार तसेच वाडा (जि. पालघर) येथून ताब्यात घेतले. या आरोपींना काळ्याबाजारात विक्रीस असलेले एकूण ६१ हजार रुपये किंमतीचे २० रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले. या गुन्ह्यातील आरोपींची संख्या ही आता ८ वर गेली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कामगिरी आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक, इरफान शेख यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कपले यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कपले हे करीत आहेत.
रॅकेट मागे कोणाचा हात?
रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार प्रकरणात अजून काही व्यक्तींचा समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. या रॅकेट मागे कोणाचा हात आहे? एकूण किती रेमडेसिवीर त्यांनी विकले आणि ते कसे आणले? याचा सखोल तपास पोलीस करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी सांगितले.
हेही वाचा - 'ई-पास'साठी बोगस 'आरटीपीसीआर' प्रमाणपत्र देणारे दोघे अटकेत