नाशिक - केंद्र सरकराने कांदा निर्यात बंदीचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे, अशी भूमिका घेत नाशिक जिल्ह्यातील नामपूर, बागलाण, उमराने भागातील शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी सरकारचा निषेध केला.
कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना कवडीमोल भावात कांदा विकण्याची वेळ आली होती. साडे पाच महिन्यानंतर आता कुठे कांद्याला चांगले दर (3 ते 4 हजार रुपये क्विंटल) मिळत होते. मात्र, केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. सरकारच्या निर्णयाने शेतकरी संतप्त झाले आहेत. याचे पडसाद आज नाशिक जिल्ह्यात उमटले. नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकार विरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको केला.
निर्यातबंदी चुकीची -
कांद्या पीकात शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळत आहेत. तर लगेच केंद्र सरकारने निर्यातबंदी केली. पावसामुळे कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. मागील पाच महिने कांद्याला चारशे ते पाचशे रुपये क्विंटल इतका कवडीमोल भावा होता. यात उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्चदेखील सुटला नाही. त्यावेळी सरकारकडे कुठल्याही मदतीची अपेक्षा केली नाही. मात्र, आता भाव वाढले तर सरकारने निर्यातबंदी करत शेतकऱ्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने केलेली निर्यातबंदी चुकीची असून यावर पुनर्विचार व्हावा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
नाफेडची तीन राज्यांमध्ये 1 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी -
नाफेडच्यावतीने महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये एक लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट होते. महाराष्ट्रामध्ये 80 ऐवजी 87, मध्यप्रदेशमध्ये 10 ऐवजी 12 तर गुजरातमध्ये 10 ऐवजी 7 मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आली. त्यातून महाराष्ट्रातील काही साठा विकला असल्याचे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी सांगितले.
बांगलादेश सीमेवरील 20 हजार मेट्रिक टन कांदा परत -
सरकारने अचानक कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने बांगलादेश सीमेवर 20 ते 21 हजार मेट्रिक टन कांदा परत भारतात आणून कर्नाटकमध्ये त्याची विक्री केली जाणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हीच परिस्थिती मुंबई येथील बंदरात आहे. त्या ठिकाणी देखील 400 कंटेनर अडकून पडले आहेत.