नाशिक - खरिपाच्या तोंडावर हाती भांडवल नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी वाढत आहेत. त्यातच बँका शेतकऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याची स्थिती आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी देवळा व बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेर यांची भेट घेतली. मात्र, अध्यक्षांनीच त्यांच्यासमोर अडचणींचा पाढा वाचला. तर, आता तातडीने खरीप कर्ज उपलब्ध करून द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
खरीप हंगामात पीककर्ज वाटपासंदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेर यांची सोमवारी (१५ जून) बाजार समितीच्या दालनात भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी प्रश्नांचा भडिमार करत रास्त मागण्या केल्या. शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेकडे अनेक मोठ्या ठेवी जमा आहेत. तसेच पीक विमा, अनुदानाच्या रकमा जमा असून, त्या मिळत नसल्याने शेतकरी व बँकेचे ठेवीदार अडचणीत असल्याची कैफियत शेतकऱ्यांनी पुराव्यानिशी मांडली.
हक्काची व विश्वासाची संस्था म्हणून लाखो रुपयांच्या ठेवी बँकेत जमा आहेत. मात्र, मुदत टळूनही त्या मिळत नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी वसंतदादा सहकारी साखर कारखान्याला तीन वर्षांपूर्वी ऊस पुरवठा केला. ही उसाच्या बिलांची रक्कम स्थानिक शाखेत जमा असूनही ती मिळत नसल्याचे ऊस उत्पादकांचे प्रतिनिधी कुबेर जाधव यांनी ही बाब लक्षात आणून दिली. शेतकरी खरीप हंगामाकरिता कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी चालू पीककर्ज उपलब्ध न झाल्यास अडचणी वाढत्या आहेत, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
आहेर यांनी सांगितले की, बँकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असून कर्जवसुली होत नाही. त्यात कर्जमाफीची रक्कम अद्याप शासनाकडून जमा झाली नसल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. बँक पाहिजे त्या प्रमाणात कर्जवाटप करू शकत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्याचे समन्वयक कुबेर जाधव, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, विनोद आहेर, नामदेव नंदाळे आदी शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.