नाशिक - राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार राज्यात अनलॉकला सुरवात होणार आहे. याच अधिसूचनेनुसार नाशिक नेमक्या कोणत्या स्तरावर आहे, याचा खुलासा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला. नाशिक जिल्हा तिसऱ्या टप्प्यात असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा - Nashik Unlock : पहिल्या टप्प्यात नाही तर तिसऱ्या टप्प्यात, पॉझिटिव्हिटी रेट ७.७५ टक्के
भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी ऑनलाइन बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषद सीइओ, जिल्हा पोलीस अधीक्षक, सिव्हील सर्जन आदी सहभागी झाले होते. बैठकीत पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी कोरोना निर्बंध शिथिलतेबाबत घोषणा केली.
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ७.७५ टक्के
पाच टप्प्यांचा विचार करता शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार नाशिकच्या एकूण कोरोना परिस्थितीवर नजर टाकली असता जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ७.७५ टक्के, तर १७.७१ टक्के ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत. ऑक्सिजन बेडचे निकष जरी शासन निर्देशाप्रमाणे असले तरी, पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे, शासनाने जाहीर केलेल्या टप्प्यांमध्ये नाशिक तिसऱ्या टप्प्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
नाशिक शहर आणि जिल्ह्याचा राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार तिसऱ्या टप्यात समावेश होत असल्याचे समजत असून यात लग्नाला 50 लोकांच्या उपस्थितीसह सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल 4 वाजेपर्यंत सुरू राहणार, मॉल्स, नाट्यगृह बंदच राहणार आहे.
हेही वाचा - नाशिक : हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न आंदोलन केल्याप्रकरणी अखेर जितेंद्र भावे यांच्यावर गुन्हा दाखल