नाशिक- हिंदी चित्रपट अभिनेता अंशुमन खुराणा याचा ड्रीम गर्ल चित्रपट कथानकाला शोभेल अशी घटना समोर आली आहे. नाशिकच्या म्हसरूळ भागात राहणार अमोल बाळासाहेब अहिरे (30 ) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यावरून म्हसरूळ पोलिसांनी अर्जून तात्याराव उफाडे (रा. मरगळवाडी, गंगाखेड, परभणी) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अमोल यांनी सन 2020 मध्ये इन्स्टाग्रामवर ईश्वरी मुंढे या नावाच्या अकाउंटला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. मुलीच्या नावानं असलेल्या अकाउंटवरून होणाऱ्या तासंतास होणाऱ्या चॅटिंगमध्ये अमोल समोरील मुलीच्या प्रेमात गुंतला. त्यातून ईश्वरी नावाने संवाद साधणाऱ्या व्यक्तीनं एक मोबाइल क्रमांक दिला. त्यावरून मुलीच्या आवाजात अनेकदा अमोल सोबत फोनवर बोलणे केले. त्या व्यक्तीनं वेळोवेळी काही कारणातून पैसे घेतले.
वडिलांच्या आजारपणाचे कारण देत गंडा- संशयितानं एकावेळी वडिलांच्या आजारपणाचे कारण पुढे करीत 1 लाख 96 हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे स्वीकारण्यासाठी ईश्वरीचा भाऊ या नात्याने संशयित विकास मुंढे नाव धारण करून अमोलला प्रत्यक्ष भेटण्यासाठी आला. त्याने दोन लाख रुपये स्विकारून गावी पोबारा केला. यानंतरही काही दिवस चॅटिंग सुरूच राहिली. मात्र,पैसे परत मागितल्यावर शिवीगाळ आणि दमदाटी सुरू केली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे अमोल यांच्या लक्षात आले.त्यांनी याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल केला. यावरून पोलिसांनी संशयित विकास उफाडे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
असा काढला संशयिताचा माग- संशयितानं इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करून मुलीच्या नावाने तक्रादाराला मैत्रीच्या जाळ्यात ओढले. गप्पा वाढल्यावर वडिलांच्या आजारपणाच्या बहाण्याने स्वत:च नाव बदलून पेठरोडवरील एका हॉटेलात आला. तिथे मुलीचा भाऊ असल्याची बतावणी करून ऑनलाइन स्वरूपात पैसे घेतले. या मोबाइल क्रमांकावरून म्हसरूळ पोलिसांनी संशयित उफाडे याचा माग काढला. तपासात आरोपी परभणीचा असल्याचं समोर आलं.
1 हजार सायबर दूत- सध्या सर्वच ठिकाणी पारंपरिक पद्धतीने होणारे गुन्हेपेक्षा फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप तसेच ऑनलाइन पध्दतीचा वापर करून होणारे आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. अशात काही शिक्षित नागरिक वगळता अनेकांना सोशल मीडियाचा वापर कसा करावा याबाबत अज्ञान आहे. त्यामुळे असे नागरिक सोशल मीडियाच्या गुन्हेगारीला बळी पडत आहे. यासाठी नाशिक पोलिसांकडून सायबर गुन्ह्यांची जनजागृती करण्यासाठी 1 हजार सायबर दूत यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. यासाठी प्रशिक्षीत सायबरदूत यांना सायबर पोलिसांकडून प्रशस्तीपत्र आणि सायबर दूतचा बॅच देण्यात आले आहेत. हे सायबरदूत शहरातील शाळा, महाविद्यालय, कंपनी, संस्था आणि रहिवाशी परिसरात ठिकाणी सायबर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करतात. मोबाईल, इंटरनेट,ऑनलाईन साधने या माध्यमातून होणारे सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती करत आहेत.
अनेक प्रकरणांमध्ये रिमोर्ट एक्सेस अॅप चा वापर करून हॅकर्स बँक खाते रिकामे करतात. अशी कुठली ही लिंक आल्यास किंवा कोणी अज्ञात व्यक्तीने ओटीपी मागितला तर सायबर सेलशी संपर्क साधा-सायबर सेलचे पोलीस निरीक्षक रियाज शेख
सोशल मीडिया वापरतांना काळजी घ्या- सध्या सोशल मीडियावरून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रत्येकानं आपल्या प्रोफाइलची काळजी घेणे गरजेचं आहे. खास करून मुलींना आपले प्रोफाइल लॉक ठेवले पाहिजे. अनेक घटनांमध्ये हॅकर्स मुलीचे अश्लील फोटो वापरून ब्लॅक मेल करणे तसेच सध्या पार्ट टाइम जॉबच्या नावाने अनेक लाखोंचा गंडा घातला जात आहे. त्यामुळे पूर्ण खात्री केल्या शिवाय आपण पैसे पाठवू नये किंवा अज्ञात व्यक्तिला आपल्या बँकेचा तपशील देऊ नये. तसेच मोबाईल वर येणारी कोणतीही लिंक क्लिक करू नये, असे आवाहन सायबर सेलचे पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी केलं आहे.
हेही वाचा-