नाशिक - छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा सीआरपीएफच्या (केंद्रीय राखीव पोलिस दल) कोब्रा 206 बटालियनच्या जवानांना लक्ष्य केले. यात नाशिकचे सुपुत्र आरपीएफ सहाय्यक कमांडंट नितीन भालेराव यांचा आज रविवारी वीरमरण आले. भालेराव कुटुंबावर शोककळा पसरली आहे. नितीन भालेराव यांचा माणसं जोडणारा स्वभाव आल्याने त्यांचा मोठा मित्र परिवार आल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
नितीन भालेराव हे 2010 सालापासून सीआरपीएफच्या 206 कोब्रा बटालियनमध्ये कर्तव्य बजावत होते. नितीन भालेराव यांच्या पश्चात आई भारती भालेराव, पत्नी रश्मी भालेराव, पाच वर्षांची मुलगी वेदांगी भालेराव, दोन भाऊ असा परिवार आहे. नितीन भालेराव यांचे रायपूर येथील रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांला रायपूरवरून विमानाने मुंबईला आणले जाईल. तेथून वाहनाने किंवा हेलिकॉप्टरने त्यांचे पार्थिव नाशिकला कुटुंबीयांकडे सुपूर्द केले जाईल. त्याच्यावर लष्करी इतमामात अत्यंसंस्कार केले जातील, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून श्रद्धांजली -
नाशिकचे सुपुत्र नितीन भालेराव हुतात्मा झाले आहे. सन 2010 सालापासून भालेराव सीआरपीएफच्या 206 कोब्रा बटालियनमध्ये कर्तव्य बजावत होते. यावेळी माओवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. त्यांच्या निधनाने भारतमातेने एक वीर सुपुत्र गमावला. मी व माझे कुटुंबीय भालेराव कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. राज्य शासनाच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
जम्मू काश्मिरात जळगावच्या सुपुत्राला वीरमरण -
जम्मू काश्मिरात दहशतवादी आणि भारतीय सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत जळगाव जिल्ह्यातील एका सुपुत्राला वीरमरण आले. यश दिगंबर देशमुख (वय 21) असे हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव आहे. ते चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील रहिवासी होते. यश देशमुख हे चाळीसगाव येथील महाविद्यालयात कला शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असताना, जून 2019 मध्ये पुणे येथे झालेल्या भरतीत सैन्य दलच्या सेवेत दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी पुणे व बेळगाव येथे टप्प्याटप्प्याने सैन्य दलाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना पहिलीच पोस्टिंग जम्मू काश्मिरात मिळाली होती. सैन्य दलात सेवा बजावत असताना त्यांना वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षीच वीरमरण आले.