नाशिक : दोन दिवसांपूर्वी वादातून तरुणाची भररस्त्यात हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असतनाच, शहरात आणखी एका तरुणाचा खून झाल्याचे समोर आले आहे. कार्बन नाका परिसरात ही घटना घडली. एका तरुणाची चाकूने वार करत हत्या करण्यात आली. या प्रकरणात दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. विश्वनाथ सोनवणे पाटील (वय 26) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी रात्री दारुची पार्टी सुरू असताना मित्रांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादात शमशेर शेख आणि दिपक सोनवणे या दोघांनी मिळून विश्वनाथ पाटीलवर प्राणघातक हल्ला केला. खून केल्यानंतर अपघाताचा बनाव रचण्यासाठी या दोन्ही तरुणांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
मित्रांची विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे : मात्र रुग्णालयातील पोलिस चौकीवर ड्युटीवर असलेल्या पोलिसांना संशय आल्याने, त्यांना ताब्यात घेतले. यावेळी दोघांची विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि चौकीवर असलेले पोलिस हवालदार पि एस जगताप आणि पोलिस कॉन्स्टेबल शरद पवार यांनी दोघांना ताब्यात घेऊन गंगापूर पोलिसांच्या ताब्यात दिले.
एका महिन्यात पाच खून : नाशिक शहरात हत्येचे सत्र सुरु असून गेल्या महिन्याभरात पाच हत्येच्या घटना घडल्या आहेत. अंबड परिसरात किरकोळ कारणातून मिराज खान आणि इब्राहिम शेख यांची हत्या झाली होती. त्यानंतर दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने, अंबडमध्ये एका तरुणाची हत्या झाली होती. गुरुवारी 24 ऑगस्टला संदीप आठवलेची हत्या झाली. तर कार्बन नाका परिसरात शनिवार 26 ऑगस्ट रात्री विश्वनाथ सोनवणे युवकाची हत्या झाली आहे.
हेही वाचा -