नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. 17 मार्चला एकाच दिवशी सर्वाधिक 2,146 जणांना कोरोनाची लागण झाली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात 10 हजार 851 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
फेब्रुवारी 2021 महिन्याअखेर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नाशिककरांमध्ये समाधान व्यक्त होत होते. मात्र, नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे मार्च 2021 पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या पंधरा दिवसांत कोरोनाबधितांचा आकडा 10 हजार पार झाला आहे. रोज 1500 ते 2000 नवीन रुग्णांची भर पडत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. मागील वर्षीच्या लॉकडाऊनमुळे ओढवलेल्या आर्थिक मंदीचा अनुभव घेता प्रशासनाने यंदा काही नियम शिथिल करत निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासन अधिक कडक निर्बंध लागू करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील दुकाने सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत. तसेच शनिवारी आणि रविवारी पूर्ण दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून जीवनावश्यक वस्तूच्या दुकानांना सूट देण्यात आली आहे. तसेच शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. सार्वजनिक, खासगी कार्यक्रम, लग्न, समारंभ, सभा, मेळावे, यात्रा, उरूस करण्यास बंदी आहे. अंत्यविधीसाठी 20 लोकांना कोरोना नियमांचे पालन करून एकत्रित येण्याची मुभा देण्यात आली आहे. विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांना आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना 200 रुपये दंड आकारण्यात येत आहे.
होम क्वांरटाइन रुग्ण घराबाहेर फिरल्यास फौजदारी कारवाई -
जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण नाशिक शहारत असून आता पर्यंत 90 हजार 580 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 81 हजार 333 जण कोरोना मुक्त झालेत तर 1 हजार 74 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 8 हजार 173 रुग्ण नाशिक शहरात उपचार घेत आहेत. यापैकी 6 हजार हून अधिक रुग्ण होम क्वांरटाइन असून घरात उपचार घेत आहेत. यातील काही होम क्वांरटाइन रुग्ण घराबाहेर पडत असल्याच्या तक्रारी महानगरपालिकेला प्राप्त होत असून त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी म्हटले आहे.
व्यावसायिक, विक्रेत्यांची होणार कोरोना चाचणी -
शहरात गेल्या 15 दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून दररोज बाराशे ते तेराशे नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने विविध पातळ्यांवर जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. याच अनुषंगाने नाशिक शहरातील विविध किराणा दुकानदार, फळविक्रेते, भाजीविक्रेते,औषध विक्रेते, हातगाडी वरील विक्रेते, सलून चालक, रिक्षा चालक आदींचा अनेक लोकांशी दररोज संपर्क येत असतो. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक असल्याने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ह्या सर्व घटकांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार असून यासाठी महानगरपालिकेच्या वतीने 30 आरोग्य पथकांची नेमणूक केली जाणार आहे, असे आरोग्य वैद्यकीय अधिकरी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.
70 हजार जणांचे लसीकरण -
नाशिकमध्ये आतापर्यंत 70 नागरीकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सुरुवातीला फ्रंट लाइनमध्ये काम करणारे आरोग्य सेवक, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात आले. आता ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या 24 आणि खासगी 18 हॉस्पिटलमध्ये लसीकरण मोहीम सुरू आहे. आणखी 25 खासगी हॉस्पिटलला परवानगी द्यावी, यासाठी महानगरपालिकेकडून शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
हेही वाचा -नागपुरात लॉकडाऊनमध्येही कोरोनाचा उद्रेक; बुधवारी आढळले तब्बल ३,३७० नवे रुग्ण