नाशिक - कोविड रुग्णांना उपचार देणे सर्व खासगी रुग्णालयांना बंधनकारक आहे. कोणत्याही रुग्णालयाने रुग्णांना नाकारले तर त्यावर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे. तर रुग्णालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र पारदर्शी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
'आम्हाला कोरोना उपचाराच्या जबाबदारीतून मुक्त करा'
आजपासून (२ जून) नाशिक शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्ण दाखल करून न घेण्याचा निर्णय हॉस्पिटल ऑनर असोसिएशनने घेतला आहे. १७२ खासगी रुग्णालयांच्या प्रमुखांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबतचे पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी 'आम्हाला कोरोना उपचाराच्या जबाबदारीतून मुक्त करा', अशी मागणी केली आहे.
...तर खासगी रुग्णालयांवर होणार कारवाई
मात्र, या निर्णयावर जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी डॉक्टर्स असोसिएशनशी संपर्क साधून अशी भूमिका घेणे योग्य नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. शिवाय, 'कोविड रुग्णांना उपचार देणे हे सर्व खासगी रुग्णालयांना बंधनकारक आहे. या बिकट परिस्थितीमध्ये ८० टक्के बेड्स हे शासन आदेशाने अधिग्रहित करण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही खासगी रुग्णालयाने कोरोना रुग्णांना नाकारले तर त्यावर कारवाई केली जाईल', अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.
'रुग्णालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र पारदर्शी व्यवस्था उभारू'
'गेल्या दोन महिन्यांमध्ये डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे काही काळासाठी खासगी कोविड रुग्णालये बंद करण्याचा निर्णय हॉस्पिटल ओनर असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला आहे. मात्र रुग्णालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र पारदर्शी व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून उभी करण्यात येईल. तसेच प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती यासाठी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणार आहे, सर्व रुग्णालयांना दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. हॉस्पिटल असोसिएशन आणि आय.एम.एच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून यावर मार्ग काढणार आहे. तरीही डॉक्टरांची भूमिका बदलली नाही तर संबंधित रुग्णालय प्रशासनाला कारवाईला समोर जावे लागेल', असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
सध्या ८ हजार ४८२ रुग्णांवर उपचार सुरू
नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार, जिल्ह्यातील ३ लाख ७३ हजार ४४ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ८ हजार ४८२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत ४ हजार ७५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
हेही वाचा - राज्यात नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली; मंगळवारी 14 हजार 123 नवे बाधित