नाशिक : ऑक्सिजन व रेमडेसिवीरची मागणी वाढत आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच त्याचा वापर करावा, जेणेकरून औषधांचा अवास्तव वापर टाळण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात पथकांमार्फत नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. ही पथके आजपासूनच (19 एप्रिल) कार्यरत करण्यात आली आहेत.
अटीतटीची परिस्थिती निर्माण-
ऑक्सिजन पुरवठा व रेमडेसिवीर बाबत जिल्ह्यातील पथक प्रमुख प्रांताधिकारी, तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, की 'सद्यस्थितीमध्ये संपूर्ण राज्यभर कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यस्तरावरून होणारा ऑक्सिजन पुरवठा यामध्ये अटीतटीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. याकारणास्तव जिल्ह्यातील सर्व रूग्णालयांतील ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, आयसीयू बेड इत्यादी बाबत माहिती संकलित करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने रुग्णालयांमध्ये त्याप्रमाणे व्यवस्था अस्तित्वात आहे किंवा नाही, याची खात्री करण्यात यावी. रुग्णालयांना पुरवठा होणारा ऑक्सिजन तज्ञांच्या मार्गदर्शन सूचनांनुसार योग्य रीतीने वापरला जात आहे किंवा नाही. संबंधित रुग्णालयांची वितरण व्यवस्था, साठवणूक क्षमता इत्यादी बाबतीत नियंत्रण आणि तपासणी करण्यात यावी. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीत सध्या मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असून त्या अनुषंगाने काही रुग्णालये सरळ रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन विकत घेऊन आणण्याबाबत लिहून देत आहेत'. असे ते म्हणाले.
खात्री करण्यासाठी तपासणी पथके नेमून कार्यवाही करणार-
जिल्ह्यात या औषधाची टंचाई अथवा काळाबाजार या बाबतीत काही तक्रारी प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या औषधाच्या वाटपाकरिता मध्यवर्ती कक्ष स्थापन केलेले आहे. या कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यात दररोज प्राप्त रेमडेसिवीर इंजेक्शन साठा, जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या व ज्यांना हे औषध आवश्यक आहे. अशा रुग्णालयांच्या मागणीप्रमाणे प्राप्त साठा विचारात घेवून दैनंदिन वाटप नियंत्रण केले जात आहे. हा साठा रुग्णालयात प्राप्त झाल्यानंतर तो ज्या रुग्णांकरिता मागणी केला आहे. त्याच रुग्णांना दिला आहे का नाही किंवा कसे? याची खात्री करण्यासाठी तपासणी पथके नेमून कार्यवाही करणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले आहे.
अतिरिक्त वापर टाळण्याचे आवाहन-
ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचा सरसकट सर्व रुग्णांनी वापर करणे योग्य नाही. शासन व इतर क्षेत्रातील तज्ञ आणि इंडियन मेडिकल असोशिएशन यांच्याद्वारे निर्गमित मार्गदर्शक सुचानांप्रमाणेच या बाबींचा वापर करावा. जेणेकरून सदर औषधांचा अवास्तव वापर टाळता येईल आणि खऱ्या गरजू रुग्णांना हे वेळेवर उपलब्ध होवून त्यांना फायदा होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले.