नाशिक - शहरातील भाजप कार्यालयात रविवारी कोअर कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र या बैठकीला भाजपच्या अनेक नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले.
राज्यातील सत्ता जाताच खरं तर नाशिक महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. स्थायी समितीचे मावळते सभापती उध्दव निमसे यांनी शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह इतर नेत्यांवर तोफ डागली होती. त्यांनी भाजपच्या नेत्यांना गर्व आला असून जनतेला तो नकोसा झाल्याचे म्हणत, अशा नेत्यांमुळेच राज्यातील सत्ता गेल्याची टीका केली होती. तसेच त्यांनी नाशिकमधील नेतृत्व बदल करण्याची मागणी केली होती.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत धुसफूस ओळखून चंद्रकांत पाटील यांनी नाशिकचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत एक कोअर कमिटी बैठक घेतली आणि त्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांमधील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. पण या बैठकीलाच अनेक नगरसेवकांनी दांडी मारली.
नाशिक भाजपमधील अंतर्गत वादाविषयी चंद्रकांत पाटलांना विचारले असता त्यांनी सांगितलं, 'नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी वगैरे नाही. हे शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस सारखं असतं. सकाळी नाराजी असते संध्याकाळी एकत्र चहा घेतात. मतं वेगळ असतात आणि हे नैसर्गिक आहे.'