नाशिक: नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुक चुरशीची झाली. सर्वच पक्षांच्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यासाठी काही राजकीय नेत्यांनी मतदारांना खुश करण्यासाठी त्यांची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये केली होती. मात्र विरोधकांना याचा फारसा फायदा झाला नाही. आजचा मतदार सुजाण असल्याचे म्हणत, महाविकास आघाडीला नाशिक जिल्ह्यात मोठे यश मिळाल्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. तसेच राज्यातील बाजार समितींच्या निकालावरून भाजप आणि आणि शिंदे शिवसेनाला मतदारांनी आरसा दाखवल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. भुजबळ फार्म येथे पत्रकारांशी बोलत होते.
छगन भुजबळ विजयी झाले: नाशिक जिल्ह्यातील येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील निवडणुका राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. या निवडणुकीचा निकाल हाती आला असून येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे वर्चस्व दिसून आले. या निवडणुकीत 18 पैकी 13 जागा मिळवीत दोन अपक्षांसह एकूण 15 जागांवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या गटाचे उमेदवार विजयी झाले, तर आमदार दराडे गटाला केवळ 3 जागा मिळाल्या आहेत.
मालेगाव मधून पालकमंत्री दादा भुसेनां धक्का: नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना होम पीचवरच मोठा धक्क बसला आहे. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उध्दव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने बाजार समितीवर सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत सोसायटी गटातून 11 पैकी 10 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांना मोठा झटका बसला आहे.
देवळा बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व: देवळा बाजार समितीत भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्यात आणि माजी सभापती योगेश आहेर यांच्या युतीमुळे सत्ता पुन्हा अबाधित राहिली आहे. शेतकरी विकास पॅनलने 18 पैकी 17 जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. निकाल जाहीर झाल्यानंतर शेतकरी विकास पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली.
सिन्नर बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व: सिन्नर बाजार समितीच्या चुरशीच्या निवडणुकीत दोन्ही गटांना समसमान जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिक कोकाटे यांच्या गटाला नऊ तर, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याही गटाला नऊ जागा मिळाल्या. दोन्ही गटात प्रचंड स्पर्धा होती. फेर मतमोजणीतही निकाल कायम राहिला.
कळवण बाजार समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व: कळवण बाजार समितीत राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखालील माजी सभापती धनंजय पवार यांच्या शेतकरी विकास पॅनलला 15 तर, माकपचे माजी आमदार जेपी गावित यांच्या पाठिंबा असलेल्या मविप्र संचालक रवींद्र देवरे यांच्या परिवर्तन पॅनलला केवळ तीन जागा मिळाल्या आहेत.
घोटीत बाजार समितीवर कॉग्रेसचे वर्चस्व: इगतपुरी तालुक्यातील घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत, ॲड संदीप गुळवे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलला १६ तर माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या परिवर्तन पॅनलला दोन जागा मिळाल्या. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पिंगळे आणि चुंबळे गटात रस्सीखेच दिसून येत आहे. तर आतापर्यंत आपलं पॅनल (पिंगळे गटाचे) वर्चस्व असल्याचे चित्र आहे.
निवडून आलेले उमेदवार: भास्कर गावित ( आपलं पॅनल ), निर्मला कड (आपलं पॅनल ), विनायक मळेकर ( आपलं पॅनल ), जगन्नाथ कटाळे ( आपलं पॅनल ), प्रल्हाद काकड ( शेतकरी विकास पॅनल ), धनाजी पाटील ( शेतकरी विकास पॅनल ), कल्पना चुंबळे ( शेतकरी विकास पॅनल ), सविता तुंगार ( आपलं पॅनल ).