नाशिक - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेनेचे माजी नगरसेवक शिवाजी चुंभळे यांना तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी त्यांना आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच जामीन अर्जावरील सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे.
बाजार समितीमध्ये सहा महिन्यासाठी कंत्राटी पद्धतीने नोकरी नियुक्तीपत्र देण्याकरिता शिवाजी चुंभळे यांनी सुमारे दहा लाख रुपयांची लाच मागितली होती. तर तडजोडी अंती सहा लाख रुपये रक्कम ठरविली गेली. त्यामध्ये लाचेच्या पहिला तीन लाख रुपयेचा हप्ता स्वीकारताना शिवाजी चुंभळे यांना बागायतदारांच्या वेशात असलेल्या पथकाने रंगेहात अटक केली.
तसेच त्यांच्या घराची तपासणी केली असता त्यांच्याकडे 30 तोळे सोने, एक किलो चांदी, 70 पेक्षा अधिक वेगळ्या जमिनींच्या सातबाऱ्याची कागदपत्रे, आठ ते दहा खरेदीखत, विविध बँकांचे खाती, परदेशी मद्य मिळून आले आहेत. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस कोठडीसाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे समजते.