नाशिक - गेल्या दहा दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात बुधवारी सायंकाळी पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील नादगाव, मालेगाव, चादवड, देवळा, कळवण, निफाड, सिन्नर तालुक्यात पेरणीनंतर पाऊस न पडल्याने शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या काही दिवसात पाऊस नाही पडला तर शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ येणार आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीलाच यंदा जोरदार पावसाने हजेरी लावली होती त्यामुळे बागलाणच्या पश्चिम पट्यातील तळवाडे दिगरसह परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मका, बाजरी, भुईमूग, मूग आदी पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे. पेरणीनंतर देखील दोन-तीन दिवस परिसरात जोरदार पाऊस झाला होता. मात्र गेल्या दहा दिवसापासून पाऊस गायब झाल्याने व तीव्र उन्हाच्या तडाख्याने कोवळी पीक कोमेजू लागल्याने बळीराजा मोठ्या चिंतेत पडला होता. त्यातच काही शेतकऱ्यांनी पिकांची कोळपणी सुद्धा केली होती व त्यानंतर शेतकऱ्यांच्या नजरा मात्र आकाशाकडे लागल्या होत्या. अशातच आज बुधवारी सायंकाळी एक तास पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा मात्र सुखावला आहे.