नाशिक(नांदगाव) - नांदगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरात असलेले सर्व कोरोना रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता नांदगाव शहर कोरोनामुक्त झाले आहे. नांदगाव शहरात एकूण 11 कोरोनाबाधित सापडले होते. त्या पैकी 3 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर उर्वरित 8 रुग्णांवर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते.
उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांनी कोरोनावर मात केली. नांदगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीया देवचक्के, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. रोहन बोरसे यांच्या सह कर्मचाऱ्यांनी सर्व रुग्णांवर पुष्पवृष्टी करत त्यांना निरोप दिला. सुरुवातीला नांदगाव शहरात कोरोनाचा एकही रूग्ण नव्हता. मात्र, नंतर अचानक एक-एक करत रुग्णांची संख्या वाढत गेली. त्यातच तीनजणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रशासनाने अतिशय गतीमान करत उपाययोजना राबवल्या.
नांदगाव शहर कोरोनामुक्त झाले असून मनमाड शहरातील व ग्रामीण भागातील काही रूग्ण बरे होताच संपूर्ण नांदगांव तालुकाच कोरोनामुक्त होईल. यासाठी आता नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे, असे मुख्याधिकारी देवचक्के म्हणाल्या.