नाशिक : Sanjay Raut On Dada Bhuse : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या गृह खात्याच्या प्रतिष्ठेची जाण असेल तर त्यांनी ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पळून जाण्यास मदत करणारे सत्ताधारी मंत्री, आमदारांनी सखोल चौकशी करावी तसेच मंत्री दादा भुसे यांचा राजीनामा घ्यावा, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
भुसे यांची पुराव्यांशी छेडछाड : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राची काळजी असेल तर नाशिक मधील ड्रग्स प्रकरणाची सखोल चौकशी करावी. पुण्याच्या ससून रुग्णालयात इतके दिवस ललित पाटील कसा राहिला, तो जेलमधून कसा बाहेर आला, त्याला कुठल्या भाजपाच्या माणसाने मदत केली, हे सगळ रेकॉर्डवर आलेले आहेत. त्यामुळे सर्वांत आधी दादा भुसे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. भुसे हे पुराव्या संदर्भात छेडछाड करत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
फाइल कधीच बंद होत नाही : छगन भुजबळ खोटं बोलत आहेत. महाविकास आघाडी ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. महाविकास आघाडी सुरू असताना भुजबळ नुकतेच तुरुंगातून सुटून आले होते. भुजबळ आता काय म्हणत आहेत याला महत्त्व नाही. त्यांना मंत्रिपद आणि ईडी पासून संरक्षण हवं होतं. म्हणून ते तिथे आहेत. मात्र फाईल कधी बंद होत नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
मराठी-गुजराती वाद : भारत विरुद्ध गुजरात असा वाद निर्माण झाला आहे. गुजरात विरुद्ध मराठी नाहीतर गुजरात विरुद्ध भारत असा वाद होईल. देशातील उद्योगावर गुजराती व्यापारी कब्जा करत आहेत असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
178 कोटींचा अपहार : गिरणा साखर कारखान्यात मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या 178 कोटी रुपयांचा अपहार केला आहे. गेले अनेक वर्षे शेतकरी आंदोलन करत आहेत. या संदर्भात न्यायालयात खटले सुरू आहेत. दादा भुसे यांनी कितीही खटले दाखल केले तरी हे लपून राहणार नाही. मी या संदर्भात ईडी आणि सीबीआयकडे तक्रार केली आहे. 2024 मध्ये तरी त्यांच्यावर कारवाई होईल असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.
हेही वाचा: