नाशिक- जिल्ह्यातील हरणबारी धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाबरोबरच छोट्या मोठ्या नाल्याचे पाणी मोसम नदीच्या पात्रात आल्याने पुराच्या पाण्यात वाढ झाली. मालेगांव शहरातील सर्वच पूल पाण्याखाली गेले. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पादचारी पुलावर पाणी येवू लागले आहे. त्यामुळे 1969 नंतर प्रथमच मोसम नदीस पूर आला आहे.
संगमेश्वर रस्त्यावरील नदीलगत असलेल्या घरे व दुकानात पाणी शिरले आहे. किल्ला भागातील नदी किनारी असलेल्या घरांमध्येही पाणी घुसले आहे. पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने पोलीस प्रशासनाने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त सर्वच पूल परिसरात लावला आहे. महादेव घाटावर पाणी चढून मंदिरात पाणी घुसले आहे. नदीपात्राची पाणीपातळी वाढत चालल्याने मोसमवरील इतर १३ पूल वाहतुकीला बंद केले आहेत. यामुळे शहर व संगमेश्वर तसेच शहर व कॅम्पचा संपर्क तुटला आहे. मालेगांव शहराती मौसम नदी लगत राहणाऱ्या साडेपाचशे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. प्रशासनातर्फे येथील नागरिकांची मंगल कार्यालय आणि म.न.पा.शाळेत राहण्याची व जेवनाची व्यवस्था केली आहे.