नाशिक - मालेगावातील कोरोनाबाधितांचा आकडा चिंतेत भर घालत असतानाच आता आणखी दोन बाधितांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत मालेगावात आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोघांची वाढ झाली आहे. आज 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मालेगावात आता कोरोनाबधितांची संख्या 96 झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यात 110 जणांना लागण झाली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण मालेगावात असून प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले परिसर सील करण्यात आले असून नागरिकांची आरोग्य विभागामार्फत तपासणी सुरू आहे. तसेच मालेगावमध्ये येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर नाकेबंदी करण्यात आली असून शहरातून बाहेर जाण्यास आणि प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.