नाशिक : नाशिकमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून ज्या भागात कोरोना रुग्णसंख्या वाढते आहे त्या भागातील आरोग्य व्यवस्था कशी आहे, याबाबत आढावा घेण्यात येत आहे. याच अनुषंगाने नाशिक जिल्हा रुग्णालयात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थित मॉकड्रिल घेण्यात आली. यावेळी डॉ. पवार यांनी कोरोना रुग्णांच्या व्यवस्थेबाबत आढावा घेत रुग्णालयाची पाहणी केली.
नाशिक शहरामध्ये रुग्णांची झपाट्याने वाढ : गेल्या काही दिवसापासून नाशिक शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली आहे. याबाबत नाशिक जिल्हा रुग्णालयात कोरोना बाबत काय तयारी करण्यात आली आहे, याचा आढावा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी घेतला. रुग्णांची संख्या वाढल्यावर प्रशासनाची धावपळ व्हावी नाही यासाठी मॉकड्रिल केलं जात आहे, असं डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितलं.
'आवश्यक असल्यास मास्क वापरा' : कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना ज्येष्ठ रुग्णांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठीही प्रशासनही सज्ज झालं आहे. आवश्यकतेनुसार राज्य सरकार लसीही खरेदी करू शकतात. तसेच गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी स्वत: हून स्वत:ची काळजी घेणं आवश्यक आहे. नागरिकांनी आवश्यकतेनुसार मास्क वापरावा, असंही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितलं आहे.
रुग्णालयातील व्यवस्था : नाशिक जिल्हा रुग्णालयात 80 आयसीयु बेड तर 58 व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयात 150 बेड असून 50 आयसीयू बेड, 100 ऑक्सीजन बेड आणि 46 व्हेंटिलेटर बेड आहेत. नाशिक रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात 650 बेड पैकी 120 आयसीयू, 530 ऑक्सिजन बेड, 119 व्हेंटिलेटर बेड आहेत. मायको हॉस्पिटलमध्ये 50 ऑक्सीजन बेड तर
संभाजी स्टेडियम मध्ये 180 ऑक्सीजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सर्वच रुग्णालयात मुबलक ऑक्सिजन व्यवस्था असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, 10 एप्रिल रोजी 24 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यात नाशिक शहरात 9, जिल्ह्यात 13 आणि मालेगाव मध्ये दोन रुग्ण आढळून आले आहेत. तर सध्या 79 रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.