नाशिक (येवला) - अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल हे निकृष्ट दर्जाचे आहेत. शासनाचे ॲप त्यामध्ये चालत नाही. त्यामुळे हे सर्व मोबाईल आज येवला पंचायत समितीमध्ये या अंगणवाडी सेविकांनी जमा करत मोबाईल वापसी आंदोलन केले आहे.
येवल्यातील अंगणवाडी सेविकांनी पंचायत समितीसमोर मोबाईल वापसी आंदोलन केले. शासनाने दिलेल्या जुन्या मोबाईलची सध्याची परिस्थिती व कॅश हा चांगल्या प्रकारचा ॲप बंद करून त्याऐवजी केंद्र शासनाने लादलेला पोषण ट्रॅकर हा सदोष ॲप याबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागत होते. कृती समितीने याबाबत वेळोवेळी निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. शेवटी येवला तालुक्यातील अंगणवाडी कर्मचार्यांनी आपले मोबाईल पंचायत समितीकडे जमा करत मोबाईल वापसी आंदोलन केले.
काय आहेत मागण्या?
शासनाने दिलेला मोबाईल चालत नसून जुने मोबाईल परत घ्या व नवीन चांगल्या दर्जाचे मोबाइल द्या. तसेच, पोषण ट्रॅकर ॲप रद्द करावा, मोबाईलचे वाढलेले काम पाहता या भत्यात किमान 2000 व 1000 रुपये अशी वाढ करावी, अंगणवाडी सेविकांचे रिक्त पदे भरण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकानी पंचायत समिती कार्यालयासमोर मोबाईल वापसी आंदोलन केले.