नाशकात राष्ट्रवादीच्या घडाळ्याला मनसेच्या इंजिनाची गती; भुजबळांच्या भेटीला मनसैनिकांची रीघ
नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी- शाह यांना बाजूला करण्यासाठी कोणालाही मदत करा, असे आदेश मनसैनिकांना दिले आहेत. त्याचाच फायदा नाशिकमध्ये भुजबळांना होताना दिसून येत आहे. नाशिक लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना तिकीट देण्यात आले आहे. दरम्यान मनसे अध्यक्षांच्या आदेशानुसार नाशकात मनसे कार्यकर्ते छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी त्याच्या फार्म हाऊसवर गर्दी करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
आता पर्यंत मनसेचे माजी आमदार नितीन भोसले, माजी महापौर अशोक मुर्तडक, राहुल ढिकले, डॉ प्रदीप पवार, सलीम शेख, शहर अध्यक्ष अनिल मटाले,अनंता सूर्यवंशी आदींनी छगन भूजबळ यांची भेट घेतली आहे.
२००९च्या निवडणुकीत नाशिक हा मनसेचा गड मानला जात होता. नाशिककरांनी राज ठाकरे यांना साथ देत, मनसेचे तीन आमदार निवडून दिले होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी प्रचारादरम्यान छगन भुजबळांनवर जाहीर सभेत टीका करत नाशिकमध्ये सत्ता प्रस्थापित केली होती. भुजबळांनी देखील जाहीर सभा घेऊन राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले होत. त्यावेळच्या परिस्थितीवरू राज ठाकरे आणि छगन भुजबळ यांचा वाद मिटणार नाही, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो याचा प्रत्येय आता नाशकात दिसून येत आहे. यापूर्वी नाशिक महानगर पालिकेत मनसेचा महापौर बसावा, यासाठी भुजबळ यांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभागृहात तटस्थ भूमिका घेत मनसेला मदत केली होती. तर लोकसभेला नाशिक जिल्ह्यात असलेल्या मनसेच्या नेटवर्कचा फायदा मिळवण्यासाठी भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यात दिलजमाई झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मोदी आणि अमित शहा यांना बाजूला ठेवण्यासाठी भाजपला मदत करू नका, तुम्ही कोणालाही मदत करण्याचे कार्यकर्त्यांना केलेले आवाहन भुजबळांच्या पथ्यावर पडले आहेत. छगन भुजबळांनी देखील आपल्या प्रचारात राज ठाकरे आपल्यासोबत असल्याचे बोलून दाखवत आहेत. राज ठाकरे हे नाशिकला निवडणूक काळात एखादी सभा घेतील असे म्हटले जाते आहे. दरम्यान, राज यांनी एखाद्या भाषणात आघाडीच्या उमेदवाराला मदत करा असे म्हटले तरी त्यांचा थेट फायदा आघाडीचे उमेदवार समीर भुजबळांना होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.