नाशिक - मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या(मनसे) कार्यकर्त्यांनी चोप दिल्याचा प्रकार नाशिकच्या नेहरू उद्यान परिसरात घडला. या उद्यानाजवळ मुलींची शाळा असून या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतात. मागील अनेक दिवसांपासून या ठिकाणी मुलींनी त्रास देण्याचे प्रकार घडत होते. याबाबत मनसे कार्यकर्त्यांना काही तक्रारी मिळाल्या होत्या.
नेहरू उद्यान परिसरातील मुलींच्या शाळेजवळ दररोज टवाळखोर मुले घोळक्याने जमा होतात. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्यावेळी येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींची छेड काढण्याचे काम ही टवाळखोर मुले करतात. याबाबत मनसे कार्यकत्यांना माहिती मिळाली. त्यांनी बुधवारी सापळा रचून मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना चोप दिला. काही मुले मनसे कार्यकर्त्यांच्या हाती लागली, तर काही पळून जाण्यास यशस्वी झाले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुलींना स्वत:चा संपर्क क्रमांक देऊन न भीता मदत मागण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा - धक्कादायक! बेपत्ता होणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ; महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर
नाशिक शहरातील मुलींच्या शाळेबाहेर टवाळखोरांचा होणारा त्रास नेहमीचा असून विद्यार्थिनीसुद्धा अनेक वेळा भीतीमुळे अन्याय सहन करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनींच्या शाळेबाहेर पोलिसांनी गस्त वाढवावी, नव्याने स्थापन केलेल्या निर्भया पथकाच्या टीमने देखील या भागाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी, पालक आणि शिक्षक करत आहेत.