नाशिक - गेली ४० वर्ष भाजपने रामाच्या नावावर राजकारण केले हे अख्ख्या जगाने पाहिले. पण श्रीराम कोणाच्या सातबार्यावर नाही. राम मंदिराचा सातबारा कोणाच्या मालकीचा नाही, असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लगावला आहे. सिडकोतील सिंहस्थ नगर येथील मनपाच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे रविवारी आव्हाड यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी आव्हाड यांनी भाजपला टोला लगावला.
कोरोनामुक्त भारत व महाराष्ट्र घडो हीच श्रीरामचरणी प्रार्थना. प्रभू श्रीराम चंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक भूमीचाच मी सुपूत्र आहे. माझा जन्म नाशिकचा आहे. श्रीराम कोणाच्या सातबाऱ्यावर नाहीत. श्रीरामांचा सातबारा कोणाच्या मालकीचा नाही. रामाच्या नावावर राजकारण करणे वेगळं आणि भक्ती वेगळी असते, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.
गेल्या ४० वर्ष भाजपने रामाच्या नावावर राजकारण केले हे संपूर्ण जगाला माहिती आहे. रामाचे नाव घेऊन त्यांनी पाणी विकले, विटा विकल्या. सत्ता मिळवण्यासाठी जे जे करता येईल ते त्यांनी रामाच्या नावावर केले. प्रामाणिकपणा व मर्यादा हे प्रभू रामाचे गुण घ्यावे, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.