नाशिक - ‘शासनाने मका खरेदीसाठी ३० जून पर्यंत मुदत दिली आहे. मात्र मका खरेदी प्रक्रिया धीम्या गतीने होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत. शासनाने दिलेल्या मुदतीच्या आत सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण मका खरेदी करा,’ असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
छगन भुजबळ यांनी येवला येथे सुरू असलेल्या मका खरेदी केंद्राबाबत संबधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी मका खरेदी प्रक्रिया धीम्या गतीने होत असल्याचे निदर्शनास आले. यासाठी भुजबळ यांनी मका खरेदीसाठी जास्तीचे वजन काटे यासह आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील मका खरेदी बाबत आढावा घेतला. मका खरेदी प्रक्रिया जलदपणे करावी आणि जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याची मका शिल्लक राहता कामा नये, असे आदेश त्यांनी दिले.
त्याचबरोबर बारदानाअभावी मका खरेदीस अडचणी येत असल्याची बाब समोर आल्यानंतर भुजबळ यांनी त्यासंबंधी पावलेही उचलली. व्यवस्थापकीय संचालक पणन विभागाशी बैठकीतून संपर्क साधून जिल्ह्यातील सर्व मका खरेदी केंद्रावर बारदान उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना भुजबळ यांनी दिल्या. त्यामुळे पुढील दोन दिवसात मका खरेदी प्रक्रिया अधिक जलद गतीने होणार आहे.