नाशिक - येथील वेगवेगळ्या शेल्टर कॅम्पमध्ये असलेल्या 1हजार 200 परप्रांतीय मजुरांना नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने नाशिकरोड इथून विशेष रेल्वेची सोय करत मध्य प्रदेश तसेच उत्तर प्रदेश येथे पाठवण्यात आले. मात्र, जिल्हा प्रशासन दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी परवानगी देत आहे असं समजून शहरात अडकलेल्या परराज्यातील मजुरांनी आम्हालाही आमच्या राज्यात जाण्यासाठी परवानगी द्यावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्यानंतर अनेक परप्रांतीय नागरीकांनी मुंबईहुन पायी चालत आपल्या राज्याकडे जाण्यासाठी रस्ता धरला होता. मात्र, अशा नागरिकांना नाशिकमध्ये पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना वेगवेगळ्या शेल्टर कॅम्पमध्ये ठेवले होते. मात्र, केंद्र सरकारच्या परवानगीनंतर महिन्याभरापासून अडकलेल्या या मजुरांना नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून मध्यप्रदेश तसेच उत्तर प्रदेशला स्पेशल रेल्वे करत पाठवण्यात आले.
ही बातमी कळताच जिल्हा प्रशासन परराज्यात जाण्यासाठी परवानगी देत असल्याचे म्हणत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात परप्रांतीय कामगारांनी शेकडोच्या संख्येने गर्दी केली. आम्हाला देखील आमच्या गावाला जाण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. यावेळी सोशल डिस्टनसिंगचा मात्र, फज्जा उडाल्याचे दिसून आले. काही वेळानंतर पोलिसांनी त्याठिकाणी येत या या नागरिकांची समजूत काढत त्यांना कार्यालयाबाहेर काढून दिले.