नाशिक - लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नाशिक महापालिकेच्या महासभेचा तिढा अखेर सुटला आहे. नाशिक महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ही महासभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे येत्या २९ मे रोजी होणार आहे. या ऑनलाईन महासभेला आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी परवानगी दिली आहे. कोरोनाकाळात महासभा घेण्यावर बंधने आली होती.
आपत्कालीन व्यवस्थापन कायदा आणि सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमामुळे महासभा घेण्यावरुन अनेक दिवसांपासून खल सुरू होता. त्यावरून सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष यांच्यात राजकारण सुरू झाले होते. मात्र, त्यावर तोडगा काढत येत्या २९ रोजी ही महासभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर होणार आहे. त्यात सर्व नगरसेवकांना विशिष्ट अॅपवर आयडी आणि पासवर्ड देण्यात येणार आहे. त्यानुसार महासभेत सहभागी होता येणार आहे.
महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौर, नगरसेवक आणि अधिकारी प्रत्यक्ष समोरासमोर न राहता महासभा होणार आहेत. आयुक्तांच्या दालनात शेजारी कॉन्फरन्स हॉलमध्ये महापौर-उपमहापौर आयुक्त सदस्यांचे प्रश्न व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मांडता येतील.